मी फिनोलेक्स कॉलेजला होतो त्यावेळी विमानतळाजवळ रहायचो. तिकडचे रस्ते अगदी निर्मनुष्य. दूरदूर पर्यंत वस्ती नाही. आता गद्रे आणि फिनोलेक्समुळे थोडी जाग आहे पण रात्रीच्यावेळी कोणी नाही. रात्री उशीरा अभ्यास करायचो. कंटाळा आला की विमानतळावर फिरायला जायचो. आमचा जांभूळफाटा सदा सर्वदा मुलांनी गजबजलेला (पहिल्या दोन सेम पर्यंत या भागात मुली अजिबात नव्हत्या.) नंतर नंतर दोन - तीन मुली दिसायच्या. पण खरे वर्चस्व मुलांचेच. मॅकेनिकल,एलेक्ट्रीकल,एलेक्ट्रॉनिक्स, आय्.टी., एम्.सी.ए. आणि एम्.एस्.सी. अशी विविध शाखांत शिकणारी मुले येथे आढळायची. प्रत्येकजण वेगळा तरीही विविधतेत एकता. कोणी मुंबईचे, कोणी बिहारचे, कोणी गोव्याचे तर कोणी मालवणी पट्टयातले सगळे मिळून मिसळून रहायचे. के.सी.जैननगरमधील पाच महिने सोडले तर मी जवळ जवळ अडिच वर्षे महादेवनगरात राहिलो. ह्या वास्तव्याच्याकाळातील सर्व अनुभव येथे कथन करीन.
सुरुवातीच्या काळात हा भाग वेगळाच वाटायचा. रुटीन ठरलेले होते. मला आठवतयं पहिल्या सेमच्यावेळी जोरदार पाऊस होता. मी आणि माझा मित्र रविंद्र आम्ही दोघे सकाळी गडबडीत छत्री सांभाळत कॉलेजमध्ये जायचो. आता वेंगुर्लेकर असल्यामुळे आम्हा दोघांना पाऊस काही नवीन नव्हता. पण रत्नागिरीच्या या माळावरचा पाऊस थोडा हटके होता. या पावसात छत्री सांभाळणे म्हणजे एक मोठे दिव्य होते. कधी या छत्रीचा डीश अॅंटेना होईल याचा नेम नाही. तर अशा अवस्थेत मी कॉलेजला जायचो. संध्याकाळी पाच पर्यंत कॉलेज (नवीन असताना फरसे कुणी लेक्चर्स बुडवत नाही, एकदा का वातावरणात रमले की मग लेक्चर बुडवणे सुरु.) मी आणि रवी आम्ही दोघेजण संदीप पाटलांच्या घरी भाड्याने राहायचो. हादडायला बाणे काकूंची मेस होती. बाणू काकूंची मेस या एकाच विषयावर लिहीले तर् ग्रंथ तयार होईल.
त्यावेळी महादेवनगरात स्ट्रीटलाईट नव्हती. कुठेही जायचे असले तरी टॉर्च हवी. संध्याकाळी फिरण्यासाठी बरेच पर्याय होते. विमानतळ स्टॉप पर्यंत फिरुन यायचे किंवा विमानतळावर जायचे. आठवडयातून दिन ते तीन वेळा रत्नागिरीला जाणे व्हायचे. सीटीबस मधून प्रवास करत स्टॅंडवर जायचे म्हणजे एक वेगळा अनुभव. मारुतीमंदीर, बाजार, मांडवी आणि थिबा ही आमची फिरण्याची ठीकाणे. त्यावेळी महादेवनगरात साधा टीस्टॉलही नव्हता. पहिल्यांदा सकाळ-संध्याकाळच्या चहाचे वांदे व्हायचे. नंतर मी रुमवर स्वतः चहा करायचो. संध्याकाळच्यावेळी सुर्यास्त पाहत विमानतळावर बसायला फार आवडायचे. मंद सुर्यप्रकाश आणि शांत वातावरण .......
क्रमशः